१७. आयुष्य कसं असावं?

आयुष्य कसं असावं?
सिगरेट सारखं..
त्याच्या दु:खात,
स्वता:ला पेटवलेलं.
त्याच्या औट घटकेच्या सुखासाठी,
स्वत्व जाळलेलं.
त्याचे ओठ चुंबून,
स्थळकाळ भुलवणारं.
संपत आलं जरी,
त्याला समजावून चुटपुटणारं.
शेवट पायदळी तुडवलं जाणार हे जाणूनही,
त्याचं दु:ख आपलसं करणारं.

आयुष्य कसं असावं?
सिगरेट सारखं.
स्वत: राख होत,
क्षणिक का होईना,
त्याच्या संपूर्ण रोमारोमात भिनलेलं.

१६. कुणाला काय त्याचं?


काल अवसच्या रातंला,
पाल भयाण चुकचुकली,
शकून होता का अपशकून?
कुणाला काय त्याचं?

कुत्र्याच्या इमानदारीने,
लोंडा घोळत लाळ घोटली,
हाड हाडच झाली ना जीवाची?
कुणाला काय त्याचं?

मदिरेच्या धुंद प्याल्यात,
तुझीच प्रतिमा थरथरली,
अत्रुप्त तहान वाहवली.
कुणाला काय त्याचं?

सिगरेटच्या धुम्रवलयात,
धुसरलं पोळलेलं हृदय अन् शरीर,
रात गाढ बिनधास्त सुखावली.
कुणाला काय त्याचं?

नीरव डांबरी रस्त्याची शांतता,
माझ्या रक्ताने शहारली,
बघ्यांचा क्षणिक चिवचिवाट,
मेला का जगला?

खरंच..
चार दिस उलटल्यावर,
कुणाला काय त्याचं?

१५. म्हातारी आणि तो..


रणरणत्या उन्हातून धावतपळतच तो क्लिनिकला पोचला. आतल्या थंडगार एसीने त्याला जरा हायसं वाटलं. घाम पुसतच रिसेप्शनिस्टच्या डेस्कपाशी जाऊन नाव गाव सांगितलं, तर तिचा भडिमार सुरू झाला.

"अहो काय हे? तुम्हाला दीडची अपॉईंटमेंट दिली होती ना? आता किती वाजलेत? अडीच. एजुकेटेड माणसं ना तुम्ही? साधी वेळ पाळता येत नाही का?"
"सॉरी मॅडम, झाला थोडा उशीर.. "
"काय सॉरी? उशीर झाला तर बसा मग आता. इतर पेशंट्स झाल्यावर पाठवते तुम्हाला आत.. "
"ठीक आहे. बसतो मी. सांगा मग नंतर नंबर आल्यावर.."

आता आपलीच चूक आहे म्हटल्यावर तिला काही बोलण्यात अर्थ नाही हे समजून घेतलं त्याने. इकडे तिकडे पाहिलं तर अजून पंधरा-वीस पेशंट्स तरी होते. छान म्हणजे बराच वेळ लागणार आहे तर.

तो माणूसघाणी आहे. म्हणजे फारच कोणी ओळखीचं असलं तरंच त्याला बोलायला वगैरे आवडतं. तिर्हाइत लोकांशी त्याला बोलणं सुरू पण करता येत नाही, आणि त्यांनी सुरू केलेलं आवडत पण नाही. त्यापेक्षा आपलं एकटं निवांत बसावं असा त्याचा स्वभाव. कुणी माझ्याशी बोलू नये, आणि मी ही तुमच्याशी फालतू गप्पा मारणार नाही असं. आजूबाजूला रिकाम्या खुर्च्या पाहून त्याने त्यातली बरोबर मधली खुर्ची निवडली बसायला, आणि काहीच करायला नाही म्हणून मोबाइल मधे तोंड खुपसलं.

दोन चार मिनिटं उलटून गेली असतील नसतील तेवढ्यात एक म्हातार्‍या आजीबाई त्याच्या शेजारच्याच खुर्चीत येऊन बसल्या. त्याने मान वर करून पाहण्याची पण तसदी घेतली नाही. एवढ्यात म्हातारीचा सूर.

"किती वाजलं रे बाळा?"

"अडीच." त्याचं तुटक उत्तर.

"आडीच वाजल्या व्हय? लई येळ झाला म्हंजी.."

"हो.. बराच वेळ झालाय, अडीच वाजून गेलेत." त्याचं पुन्हा एकदा तुटक उत्तर.

"हा ना.. लईच येळ झाला.. आजून न्ह्यारी बी नाय केली.. किती येळ लागतोय काय म्हायती.."

आता मात्र तो त्रासला. म्हातारी गप्प का बसत नाहीये, आणि मला ही गप्प का बसू देत नाहीये? जराश्या फणकार्‍यानेच म्हणाला.
"डॉक्टर फार हुशार आहेत. फार पेशंट्स असतात त्यांच्याकडे. वेळ लागतोच इथे."

"सकाळपासणं बसलोया आमी. आता कुठं नाव आलंया. "

आता मात्र म्हातारीच्या चिकाटीला त्याने मनोमन दाद दिली. इतर वेळी त्याने लक्षही दिलं नसतं, पण आज का कोण जाणे त्याला राहावलं नाही. तसं ही आपण कधी कुणाशी नीट बोलतो? आज ही म्हातारी आपणहून बोलायचा प्रयत्न करतेय, ओळखपाळख काही नसताना. आपण तुसडी उत्तरं दिली तर तशी ही ती गप्पंच बसणार आहे. कोण जाणे तिच्या मनात काय चाललंय? ऐकायला तर काय हरकत आहे वेगळं काही म्हणून? आपल्या आयुष्यातली दोन-चार मिनिटं तिला दिली तर असं काय आभाळ कोसळणार आहे? तसं ही काय करतोय आपण? मोबाइल मध्येच तोंड खुपसलंय ना? असा विचार मनात आल्यावर त्याने आपसूकच मोबाइल खिशात टाकला, आणि म्हातारीकडे तोंड फिरवलं.

म्हातारी होती एकदम लहानशी मूर्ती. समोर एखादी दहाबारा वर्षाची मुलगी बसली असावी अशी शरीरयष्टी. पिवळ्या रंगाची छापील नववारी, त्यावर न साजेसं पोलकं. अंगावर दोन-चार माफक दागिने. चेहरा सुरकुतलेला आणि सत्तरच्या घरात असल्याची जाणीव करून देणारा. केस जवळपास पांढरे. समोरचे दात पडलेले आणि बाकीचे दातवनाची काळी पुटं ल्यालेले. चेहर्‍यावर काळजी स्पष्ट पसरलेली. न राहवून त्यानेच मग विचारायला सुरूवात केली.

"तुम्हाला दाखवायचंय का डॉक्टर ला?"

"न्हाई.. नात आणलाय. डोक्याला सर्किट झाल्यावानी करतोय."

"म्हणजे? काय लागलं वगैरे होतं का डोक्याला?"

"न्हाई वो. असाच येड्यावानी कराय लागलाय. मंधीच झोपंच्या गोळ्या खाल्ल्या. दोन दिस बिनसूद व्हता. गावाच्या डाक्टरला दावलं. त्यो म्हनला, ह्यानी झोपंच्या गोळ्या खाल्ल्याता. मी नाय हात लावणार. उगंच मेला गेला त माही जबाबदारी न्हाई. तसाच मंग दोन दिस बिनसूद पडला घरात. आमी तरी काय करावा? डाकटरच बघाना त आमी कुणाला दावावा? मंग कशीतरी सूद आली त्याला. तुमच्यावानीच एक डाकटर हाय वळखीचा गाववाला. हितं ससून ला व्हता. त्यो म्हनला ह्याला पुण्याला न्ह्या. गावात दावून उपेग न्हाई. ह्या डाकटरचा पत्ता दिलता. म्हणून हितं आलोया.."
म्हातारीने एका दमात सगळं काही सांगून टाकलं.

"हो. चांगले आहेत हे डॉक्टर. करतील सगळं व्यवस्थित. कुठून आल्या तुम्ही आजी?"

"लई लांबून आले रं बाबा. बार्शी हाये ना तिकडं. थितनं."

"मग तुम्ही एकट्याच घेऊन आल्या नातूला की सोबत आणलंय कुणाला?"

"आवो कोण हाये सोबतीला. आई बा मरून गेलं पोराचं लहान असतानीच. त्याला कोण न्हाई. मी हाये आन् आमचं मालक. मालकास्नी यायला जमंना. जनवारापाशी कोण न्हाई. मंग ते घरलाच हाईती. मी आन् नात दोघंच आलतो. काल दुपारचं चार ला बसल्यालो बघा येश्टीत. रातचं बारा झालं हितं पोचाया. ते पुलगेट का काय हायेना?"

"हो हो पुलगेट आहे ना. स्वारगेटच्या आधी येतंय."

"हां. त थितं उतारलो रातचं बाराला. मी एकलीच, ह्यो बाबा त असा येड्यावानी करतोय. रस्त्यानी कुणी माणूस बी न्हाई. तशीच चलले रं बाबा मंग. पार भवानी पेठंपतूर. लई येळ चालत व्हतो, ह्यो बाबा बी मंदीच कटाळल्यावानी कराय लागला. रिक्षा बी गावना. येक व्हता, त साठ रूपय म्हनला. येवढं पैसं कुठनं देयाचं? बळच चललो मंग. पार एक वाजल्या असत्यान घरला पोचाया."

"हो खरंय तुमचं. रात्री रिक्षावाले फार अडवून पैसे मागतात."

"हा ना. पण माणसं पघून त मागावं ना? रातचं टाईम हाये, म्हातारं माणूस हाये, येवढं पैसं बी न्हाईत देयाला. का उगं आडून धरावा. माणूसकी नाय व्हय काय उलशीक?"

"ह्मम्म्म. तसेच करतात ते रिक्षावाले. माणूसकी नाही राहिली आता, सगळे पैश्याच्या मागे आहेत. मग कोण आहे का पुण्यात तुमचं नातेवाईक वगैरे? कुठे थांबल्या काल रात्री?"

"दुसरी सून र्‍हाती ना हितंच. तिच्या घरला गेलो. पण सून तरी आपली आसती का? उगं कुठं तरी रात काढायची म्हणून आसरा. त्यांला बी लय ग्वाड वाटतंय व्हय आपून आल्यालं?"

"ह्मम्म्म. आज काल कोण नाही राहिलं कुणाचं. सगळेच स्वार्थी झालेत."

म्हातारीला तो एवढं समजूतदारपणे ऐकून घेतोय म्हटल्यावर फार बरं वाटलं. एकदम त्याच्या मांडीवर हात फिरवून म्हणाली.
"व्हय रं बाबा. कोण नाय कुणाचं. कलयूग आलंय म्हणत्यात ते खोटं न्हाई. पण म्या बी लई जिद्दीची हाये. येळ आली त माझं मनी बी यिकीन पण नाताला काय बी कमी पडू द्याची न्हाय." गळ्यातल्या दोन पळीच्या आणि चार मण्यांच्या मंगळसूत्राला हात लावत म्हातारी बोलली.

"होईल हो चांगलं. हे डॉक्टर फार हुशार आहेत. तुमचा नातू नीटच करून पाठवतील." तो एकदम आश्वासक सूरात बोलला.

"मंग त देवंच पावला."

म्हातारीबद्दल आता त्याला सहानुभूती वाटायला लागली. किती विचारू आणि काय विचारू असं झालं.
"आज मग तुम्ही परत जाणार का घरी? की इथंच थांबणार?"

"घरालाच जावा म्हणतोय. हितं तरी परत काय त्या बयाकडं र्‍हायाचं? आपलं घर गाठल्यालं बरं. जायाला सुदीक पैसं न्हाई र्‍हाईलं बगा आता. आगीनगाडीनी जाणार मंग. काय कुणी धरलं, मारलं, त मारा बाबा. पैसंच न्हाईती त आमी बी काय करावा?"

हे ऐकून तो नुसताच हुंकारला. परत काहीतरी लक्षात येऊन म्हणाला.
"तुमचा नातू कुठे दिसत नाही?"

"आत न्हेलाय त्याला दावायला. आमची सून गेलीया सोबत आतमंदी."
"बरं बरं.. " तो पुटपुटला.

थोड्याच वेळात म्हातारीचा नातू आणि सून बाहेर आली. नातू म्हणजे एकदम नुकतंच मिसरूड फुटायला लागलेला कवळा पोरगा. सूनेकडे त्याने पाहिलं तर तोंडावरूनच कजाग दिसत होती ती.
म्हातारीपाशी येऊन सून म्हणाली,
"डाक्टरनी ह्या गोळ्या ल्हिवून दिल्याता. "

"मंग हितंच घिऊ. गावाकडं बी मिळायच्या न्हाईत. डाकटरला बी दाऊन घिऊ जाताणी."

सून मग म्हातारी कडे बघायला लागली. म्हातारी उमजून कमरेच्या पिशवीला हात घालत म्हणाली,
"किती पैसं दिऊ?"

"आता मला बी काय म्हायती? न्हाई त एक काम करा की, तुमीच चला संग. काय व्हत्यानं ती व्हत्यानं पैसं." सुनेने आपला रंग दाखवला.

म्हातारी मग उठली. ती, नातू आणि सून तिघे बाहेरच्या मेडीकल स्टोअर कडे निघाले.

त्याचा नंबर यायला अजून बराच वेळ होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एकदम त्याला स्वता:चं लहानपण आठवलं. पायाला धड कधी नीट चप्पल पण मिळाली नाही. अगदी कॉलेजला जाईपर्यंत स्लिपर वापरली आपण. ती पण तुटली तर, तशीच पिना मारून ढोपरायची. वर्षाला दोन ड्रेस गावातल्याच टेलर कडे शिवलेले. शर्ट अगदी गुढग्यापर्यंत, आणि पॅंट टाचेच्याही खाली. का तर, वाढत्या अंगाला बरे, पुढे आपरे होऊ नयेत. हॉटेलमधलं चमचमीत कधी खायचं म्हणजे सनासारखं. वर्ष, सहा महिण्यातून कधीतरी एकदा. त्याच्या लहानपणी सॉफ्ट ड्रिंक्स च्या हॉटेल मध्ये लावलेल्या बाटल्या त्याला फार आवडायच्या. वेगवेगळ्या रंगांच्या. कुतुहूलाने तो फक्त बाहेरून पाहायचा त्यांना. आयुष्यात कधी असलं काही प्यायला मिळेल अशी अपेक्षा ही केली नव्हती त्याने.

आणि आता - किती तरी बदललो आपण. सगळं मिळवलं स्व:कष्टावर. आता पायात चार हजारचे बूट घालतो. दीड हजारचे शर्ट, दोन हजाराची पॅंट घालतो. हॉटेलिंग तर कधीही मनात आलं की. सॉफ्ट ड्रिंक्सचं आकर्षण तर कधीच गळून पडलं. उलट नवीन गोष्टी सुचायला लागल्या. पब मधे जाणं सुरू झालं. एका रात्रीत पब मध्ये दोन चार हजार रुपये उडवणं नॉर्मल वाटायला लागलं. आणि अजून काय काय. आणि ही म्हातारी बिचारी. गरीबीने अगदी पिचून गेलीय. शेजारी शेजारी बसलेल्या दोन व्यक्तींच्या जीवनात कसली घोर तफावत ही. त्याला एकदम विचित्र वाटायला लागलं.

असा आपल्याच विचारात गढला होता तो, तेवढ्यात म्हातारी आणि ते दोघे परत आले गोळ्या घेऊन. डॉक्टर कडे गेले. गोळ्या वगैरे दाखवून परत आले. आता निघायची वेळ झाली त्यांची. म्हातारी आणि ते दोघे तसेच क्लिनिकच्या बाहेर पडायला लागले. काय करावं हेच त्याला कळेना. खुर्चीत तसंच बसून ही राहावेना. आपण एक जरी मिनिट अजून इथेच बसलो तर ती म्हातारी कायमची निघून जाईल. तिचं जीवन तसंच चालू राहील, आपलं पण तसंच. काहीच तर फरक पडणार नाही. नाही, असं नकोय, काही तरी तर केलंच पाहिजे. नक्कीच.

झटक्यात तो खुर्चीतून उठला. बॅग तशीच पडू दिली तिथे. धावतच बाहेर आला. म्हातारी पुढे चालत होती. जोरात हाक मारली त्याने.

"आजी, अहो आजी.."

म्हातारी आणि ते दोघेही थांबले. मागे वळून फक्त पाहत राहीले.
तो म्हातारी जवळ गेला, काय करावं सुचेना. पटकन खिशात हात घालून पाकीट काढलं. शंभरची नोट हाताला लागली, ती म्हातारीच्या हाती ठेवली आणि म्हणाला.

"आजी, तुम्हाला घरी जायला पैसे नाहीयेत ना? मग हे घ्या. थोडेच आहेत, पण तुमच्या दुसर्‍या नाताने दिलेत असं समजा.."

म्हातारीला काय बोलावे हेच सुचेना. सून आणि नातू दोघे चकीत झाले. म्हातारीला एकदम मायेचा उमाळा फुटला. शब्द फुटेना तोंडून. हात वर केला आणि त्याच्या गालावरून मायेने हात फिरवला. त्याला ही काय बोलावं हे सुचेना, म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवून एवढंच म्हणाला,

"तुम्ही मला माझ्या आजी सारख्या आहात. राहू द्या हे पैसे."

नातू कडे वळून म्हणाला.
"नीट राहा रे बाबा. त्रास नको देऊ जास्त कुणाला." नातानेही मान डोलावली.

डोळ्यात नकळत पाणी तरळलं त्याच्या. मग म्हातारीपुढे जास्त वेळ थांबणं त्याला अशक्य झालं. तसाच तो माघारी फिरला. म्हातारीचा आशीर्वाद घेऊन.

शंभर रूपये म्हणजे काय होते त्याच्यासाठी?
दोन सिगरेटची पाकिटं?
एक बियरची बाटली?
सीसीडी मधली एक कॉफी?
करमत नाही म्हणून शहरभर फिरत जाळलेलं दोन लीटर पेट्रोल?
की अजून काही?

आजचे शंभर रूपये आधीच्या सर्व शंभर रूपयांपेक्षा कितीतरी किमतीचे होते त्याच्यासाठी. किंबहूना, अमूल्यच होते.

ती म्हातारी परत त्याला कधीच दिसणार नव्हती. तो त्या म्हातारीला परत कधीच भेटणार नव्हता. तरीही समाधानाचं एक हसू त्याच्या चेहर्‍यावर उमटलं होतं.

१४. कातडी

कातडीचाच चाललाय खेळ सारा,
अदिपासून अंतापर्यंत.
देवापासून दानवापर्यंत
आणि क्षुद्र मानवापर्यंत.

काळी, गोरी,
सावळी, गव्हाळी,
देखणी, लुसलुशीत
गुबगुबीत, रसरशीत,
बिलबिलीत, फिदफिदित
तलम, मऊसूत
तजेलदार,
सुरकुतलेली, जर्जरलेली,
जाळीदार.
विविधरंगी, विविधढंगी..

कातडीच्या मायाजाळातच गुरफटायचा
भोगाचा कपट इशारा.
विश्वामित्रालाही मेनकेच्या
कातडीचा नजारा.

ह्या कातडीचा माजच लई न्यारा,
म्हणून

वेश्यानो -
कातडीवर लिपापोती करा,
फाये लावा,
साज चढवा, नखशिखांत नटवा,
तिच्यावर तोकडे कपडे लटकवा,
जे झाकायचं तेच दाखवा
उरलेलं मात्र झाकून ठेवा.
बळीचा बकरा बनवा.
मग तिलाच बाजारात विका,
तिच्या जोरावर सर्वांना नाचवा,
खेळवा.
दमले की सापासारखी कात बदला,
पुन्हा नवा खेळ उभारा.

भडव्यांनो -
बघताय काय नुसती?
उठा, कुस्करा,
मुरगळा तिला.
गरम करा, लुटा,
जाळा, फटके द्या.
लक्तरे लोंबवा,
चिरफाड करा, फाडून टाका,
रक्तबंबाळ करा,
आपली वाचवा, दुसऱ्याची मारा.
नाहीतर स्वत:चीच सोलून वेशीला टांगा.
मनाविरुद्ध झालं तर डोळ्यावर ओढा,
आणि कमी पडली तर गेंड्याची चढवा.
सोलून काढून पायताण बनवा.
आणि फारच गळ्याशी आलं की,
सरड्यासारखी बदलत राहा.

खरंच ह्या कातडीचा माज लई न्यारा,
म्हणूनच -

तिलाच एकदाची नागवी करा,
सगळी सोलवटून काढा.
आत पाहिलं तर,
रक्तामासाचा चिखल नुसता.
तिचा आणि त्याचा,
सगळ्यांचाच सारखा..

थू साला..
एवढं कळत असलं तरी,
हवाहवासा वाटणारा,
हा विषाचा प्याला
कधीही न संपणारा.

शेवटी आयुष्य म्हणजे काय सालं?
कातडीचाच भोग सगळा..

१३. चेन रिअ‍ॅक्शन

तुझ्या नजरेचा न्यूट्रॉन,
जेव्हा माझ्या युरेनियमी हृदयावर,
अचानक येऊन आदळला
हृदयभरून उठलेल्या ऊर्जेने,
रोमारोमाची काहिली होत राहिली..

तुझ्या नजरेचा न्यूट्रॉन
एवढ्यावरच न थांबता
रूपं प्रतिरूपं धारण करत,
हृदयाची शकलं करत गेला
एखाद्या अनियंत्रित अभिक्रियेसारखा..

राहिले फक्त हृदयाचे भग्न अवशेष,
बेरियम आणि क्रिप्टॉनच्या रूपात
आणि शरीरभर पसरलेल्या वणव्यात,
जळत राहिलेलं सर्वांग..

१२. अपशकुन

तुझ्या देव्हार्‍यातली सांजवात
काल अचानक फडफडत राहिली
माझ्या काळजाचा ठोका चुकवत..
रित्या हातांचा लगबग आडोसा
निमीषार्धात तिला सावरायला
निष्ठूर वाऱ्यापुढे हतबल होण्याआधी..

पण तुझी सांजवात केव्हाच विझली होती.
उरला होता फक्त भयाण काळामिट्ट अंधार,
चुटपुटणारं मन,
आणि जळकट तेलाचा असह्य दर्प..
खरंय..
अपशकुनच तर झाला होता..
तुझ्या देव्हार्‍यात माझा पाय जो पडला होता..

११. तो..

त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नाहीए. त्याला मात्र त्याचं काही वाटत नाही. विचित्र म्हणा वेडा म्हणा की आणखी काही म्हणा.


त्याच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस सारखाच आहे. तो सकाळी उठतो. आरश्यात पाहिलं की तो नेहेमीप्रमाणे खरं बोलायला चुकत नाही. अरेच्या दाढीचे खुंट कितीतरी वाढलेत. डोळ्याखाली पण काळी वर्तुळं जमायला लागलीत. कपाळावर आठ्यांची गर्दी वाढतच चाललीये. ओठ काळे पडत चाललेत. सिगरेटी कमी फुंकल्या पाहिजेत लेका. त्वचा पण कशी सुरकुतल्यासारखी झालीये. ह्म्म्म्म.. जाऊदे मरूदे सालं. गेलं उडत.  तसाच घाईघाईत आवरतो तो ऑफीसला जाण्यासाठी. कपड्यांनी तर धोबी कधी पाहीलेलाच नसतो. त्यातल्या त्यात कमी मळलेले आणि कमी सुरकुतलेले कपडे तो डकवतो. चपलेचा अंगठा पण तुटलाय साला. काय फरक पडतो तसाही? कोण बघणार आहे आपल्याला? पळत पळत बस पकडत तो ऑफीसला जातो. ऑफीसमधल्या पोरी आज पण कसला अवतार करून आलंय बावळट ध्यान म्हणत फिदफिदत असतात. त्याला कशाचं काही वाटत नाही. हसायचं आहे तर हसा लोकहो. मला कसली तमा नाही. दिवसभर डोकं बुडवून काम करायचा प्रयत्न करतो तो. गडद अंधार पडल्यावर घरी येतो. काहीबाही पोटात ढकलतो. झोपायचा प्रयत्न करतो. रात्री त्याला कितीही काही केलं तरी झोप लागत नाही. रात्री त्याच्याशी जीवाभावाचं बोलायला ही कोणी नसतं. मग पहाटे २-३ वाजेपर्यंत तो नुसता झोपेची वाट पाहतो. सिगरेट वर सिगरेट फुंकत आयुष्यावर विचार करत बसतो तो.


आजकाल त्याला कशाचं सुख वाटत नाही, आणि दु:ख ही वाटत नाही. एखादी मनासारखी गोष्ट घडली, तर त्याला कडकडून आनंद होत नाही. कधी गालभरून हसू त्याच्या चेहर्यावर उमटत नाही. मनाविरुद्ध काही घडलं तर वाईटही वाटत नाही. जे चाललंय ते चालू दे. मला काही घेणंदेणं नाही अशी अवस्था झालीय त्याची. कधी कधी तर त्याला असं वाटतं की तो सर्व भाव-भावना गमावून बसलाय. बधीर झालाय त्याचा मेंदू. खरंच काहीतरी तर वाटायलाच पाहिजे ना कसल्याही परिस्थितीत. सुख, दु:ख, राग, लोभ, मत्सर. काही तरी नक्कीच. दगड झालाय की काय आपला? अमानुष झालोय आपण? हा प्रश्न पडल्यावर मग त्याला एकदम भीती वाटते. खरंच जर असं काही झालं असलं तर? भावनाच जर नसतील तर मी माणूस तरी आहे का? आणि तसं जर असेल तर आपल्यात आणि यंत्रमानवात काय फरक राहीला मग? जर मी माणूसच्या व्याख्येतच बसत नसेल तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? जे काही चालू आहे ते तसंच यांत्रिकपणे सगळं चालू द्यायचं का?


असं काही वाटायला लागलं की तो एकदम तात्विक आणि शास्त्रीय पातळीवर जाऊन पोचतो. खरंच माणसाच्या मनात निर्माण होणार्‍या भावना म्हणजे तरी काय असतं नक्की? मेंदू मध्ये त्या त्या वेळी स्त्रवणारी रसायनंच ठरवतात ना सगळं? आनंद आणि दु:ख आणि इतर भावना म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या मेंदूने दिलेली प्रतिक्रियाच नाही का? आवडणारी गोष्ट घडली की आनंद, नाही आवडलं की वाईट वाटणं हे सगळं त्या रसायनांवरच तर अवलंबून आहे की? त्याला एकदम Human Anatomy आठवायला लागते. सेरोटोनीन, डोपामीन आणि काय काय.. शेवटी यांच्याच तर हातात सगळं काही आहे. आणि नॉर्मल माणूस म्हणजे तरी नक्की काय असतं? वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मेंदूची कन्वेन्षन नुसार येणारी प्रतिक्रिया म्हणजे नॉर्मल माणसाचं लक्षण. तसं जर नाही झालं तर तो माणूस अबनॉर्मल. उद्या कोणी मेलं तर वाईट नाही वाटलं म्हणजे अबनॉर्मल, आणि परमोच्च गोष्ट घडली, तर छान नाही वाटलं म्हणजे पण अबनॉर्मलच? मग आपलं घोडं कुठं शेण खातंय नक्की? कसल्याही परिस्थितीत जर आपल्याला कधीच काही वाटत नसेल, जर आपला मेंदूच हे काम नीट करत नसेल, तर मग प्रॉब्लेम आपल्यातच नाहीये का? असा आपला मेंदू दगा देत असेल, तर आपण वेडे होत  चाललोय की काय? खरंच शहाणा आणि वेडा यात फरक तरी कसा करतो आपण? जो नॉर्मल सिचुयेशन मधे नॉर्मल वागत नाही तो वेडा असंच तर परिमाण आहे. आणि शहाणी माणसं पण वेडी झालेली किती तरी उदाहरणं आहेतच की. त्यांच्यात नक्की कसा बदल घडत जात असेल? कदाचित आपण पण त्याच मार्गावर तर नाही ना लागलो? असले अभद्र विचार डोक्यात आले की तो अस्वस्थ होवून जातो. आपल्या डॉक्टर मित्रांना विचारतो, खरंच नॉर्मल माणूस आणि तोच माणूस जेव्हा वेडा होतो, तेव्हा काहीतरी तर बदल जाणवत असतील ना? काय लक्षणं असतात नक्की अश्या वेळी? कसं ठरवलं जातं की एखादा वेडा होत चालला आहे ते? असे गंभीर प्रश्न विचारले की त्याच्या मित्रांना आयतं कोलीतच मिळतं. त्याचीच उलटतपासणी सुरु होते. तुला असं वाटतंय काय खरंच? वेडा आहेस का तू? असं म्हणून सर्व काही हसण्यावारी उडून जातं..


घरी जाण्याचंही टाळतो तो आजकाल. घरी जाऊनही काही बरं वाटत नसेल तर न गेलेलंच बरं. परवा असाच घरच्यांच्या आग्रहाखातर घरी गेलेला तो. आई प्रेमाने त्याची विचारपूस करत होती. केस फार रूक्ष झालेत म्हणे तुझे. तेल लावून मसाज करते. केसाला हात लावताक्षणीच म्हणाली ती, अरे तुला तर टाळूवर टक्कल पडायला लागलंय. फार विरळ झालेत केस. आणि पिकायला पण लागलेत कितीतरी. फार त्रास होतोय का नोकरीचा? नसलं झेपत तर सोडून दे सरळ. तो एकदम गप्प. मनात काय चाललंय हे काय सांगणार तिला. काहीतरी थातूरमातूर सांगून वेळ निभावून नेली त्याने. आता तर घरी जाण्याचं ही टाळायला लागला तो, काहीबाही कारणं सांगून. कश्याला उगाचंच घरच्यांच्या जीवाला घोर.

सगळ्याच गोष्टीतून मन उडालंय त्याचं. अगदी माणसाची प्राथमिक गरज भूक, ती पण त्याला लागत नाही. चुकून कधी काही खावंसं वाटलं तर सिगरेट फुंकतो तो. मग भूक ही कशी मरून जाते. अधूनमधून मित्रांकडे जातो तो अगदीच नाही करमलं तर. मित्रही त्याचे चरसी. अरे तुला फार बोअर होतंय का लाईफ मधे? गांजा मारलायेस का मग कधी तू? गजानन महाराज पण मारायचेच की? लई भारी वाटेल तुला.. तो ही मग म्हणतो, चला हे ही करून पाहूया. मस्त मित्रांसोबत दारू पिऊन गांजा मारतो तो. कधी नव्हे ते थोडंफार बरं वाटत असतं. अगदी हवेत गेल्या सारखं. तरंगल्यासारखं. महाराज गांजा मारायचे ते उगाचंच नाही बहुतेक? अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते की.. गांजा मारल्यावर मग त्याला कडाडून भूक लागते. अधाश्यासारखं तो २-४ दिवसांचं एकदाच खाऊन घेतो. पोट तडेला लागेपर्यंत. मग मित्राच्या दहाव्या मजल्याच्या गॅलरीत जाऊन उभा राहतो. आठवणींचं मंद वारं वाहत असतं. तो खाली पाहतो. भरून वाहणारा रस्ता आता एकदम शांत झालेला असतो. त्याच्या मनात विचार येतो, जर मी आत्ता खाली उडी मारली तर काय होईल? हात मोडेल? पाय मोडेल? की कपाळमोक्ष होईल? कदाचित मरून पण जाईन मी? खरंच नक्की काय होईल बरं? तसंही मरून जरी गेलो तरी कुणाला काय त्याचं? थोडं वाईट वाटेल सर्वांना. चार दिवस सगळे अश्रू ढाळतील, आणि नंतर पहिले पाढे पंचावन्नच नाही का? खरंच एकदा करून पाहायला काय हरकत आहे? अगदी कठड्यापाशी जाऊन उभा राहतो तो, पण खाली उडी मारायचं धाडस होत नाही. च्यायला, आपण पण नेभळट आहोत अगदी, आत्महत्या करायची पण आपली कुवत आणि लायकी नाही. तसाच पराभूत आत येवून तो अजून गांजा मारतो. आता मात्र तो पुर्णपणे चंद्रावर गेलेला असतो. काय चाललंय हे ही त्याला कळत नाही. तसाच फरशीवर लोळत तो गाढ झोपी जातो.

मित्रांना कधी काही सांगायचं म्हटलं तर त्यांना ह्याचे मौलिक विचार झेपतच नाहीत. चुकून एखाद्याला थोडंफार कळालं तर तो quarter-life crisis असं निदान करून मोकळा होतो. तू एकटा आहेस म्हणून असं बरळतोस, लग्न कर म्हणजे सगळं ठीक होईल वगैरे. घरचेही आता त्याच्या पाठीमागे लागलेले असतात लग्नासाठी. कितीही डोकं गंजलं असलं तरी त्याला एक माहिती असतं. त्याचं स्वता:वरंच प्रेम नाहिये. आणि जो माणूस स्वता:वर प्रेम करू शकत नाही, तो दुसर्या व्यक्तीवर तर कधीच करू शकणार नाही. असं जर असेल, जर भविष्यात जी कोणी त्याची सहचारिणी बनेल आणि तो तिच्यावर प्रेमच करू शकणार नसेल तर लग्न तरी का करायचं? कशाला त्या बिचारीच्या आयुष्याशी खेळायचं? हे लग्न म्हणजे तडजोडच नाही का एक प्रकारची? असले क्रांतिकारी विचार तो कुणाला सांगू शकत नाही. कारण त्याला माहीत आहे की कुणाला समजणारंच नाही हे. यावर सोपा उपाय म्हणून जी कोणी मुलगी त्याला घरचे दाखवतात, ती कितीही चांगली असली तरी तो काहीतरी उणं शोधून काढतो. आजचं मरण उद्यावर ढकलत राहतो.


कितीही माथेफोड केली आणि कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यात बदल होतंच नाही. सगळं असह्य झाल्यावर तो ही हात टेकतो. शेवटचा पर्याय निवडतो. Psychiatrist. कुठूनतरी एक प्रख्यात Psychiatrist शोधून काढतो. डॉक्टरांना भेटायची वेळ ठरते. त्याच्या आधी कितीतरी पेशंट्स हजेरी लावून असतात.. किमान तीस एक तरी. डॉक्टर फारंच हुशार असले पाहिजेत असा सहज विचार चमकून जातो त्याच्या डोक्यात. आपला नंबर येण्यापर्यंत बराच फावला वेळ असतो त्याच्याकडे. सगळीकडे तो नजर फिरवतो. सर्व स्तराची माणसं त्याला दिसायला लागतात. खरंच काय त्रास होत असेल ह्यांना नक्की? आपल्याला जसं काही वाटतंय तसंच त्यांना ही होत असेल का? की आपल्या पेक्षाही काही पटीने अधिक? देवच जाणे.

अचानक त्याची नजर तिच्यावर स्थिरावते. स्कर्ट आणि टॉप घातलेली ती. दिसायला अतिशय देखणी. आत्ताच बाहेर पडली तर चार माना नक्कीच परत वळतील अशी. बहुतेक तिच्या बाजूला तिची आई बसलेली असते, आणि शेजारच्या खुर्चीवर स्कूल-बॅग.. स्कूल-बॅग?? म्हणजे १५-१६ च्या पुढे नक्कीच वय नाही तिचं. आणि या वयात Psychiatrist?? काय झालं काय असेल तिच्या आयुष्यात की तिला जीवनाच्या ह्या वळणावर Psychiatrist ची गरज पडावी? हसण्याखेळण्याचं, बागडण्याचं, गोड गुलाबी स्वप्नं रंगवण्याचं वय हे! आणि या वयात ही पायरी चढावी लागतेय तिला? तिच्या आयुष्यात काय घडलं असेल याची कल्पनाच करवत नाही त्याला. डोकं एकदम गरगरायला होतं त्याचं. तेवढ्यात तिला आत बोलावलं जातं. थोड्या वेळाने shock-treatment साठी दुसर्या रूम मध्ये नेलं जातं. दहा मिनीटं शांतता. आणि मग ती बाहेर येते, झोलकावे खात. आई कशीबशी तिला सावरत असते आता. डोळे एकदम लालभडक झालेले असतात तिचे, सगळी चमक हरवून बसलेले. दिशाहीन. अर्थहीन. आई कसंबसं तिला सांभाळत चालू लागते. त्याचं डोकं एकदम सुन्न होवून जातं. बधीर. गलितगात्र. अचानक त्याचं नाव पुकारलं जातं. तो गडबडून आत कॅबिन मध्ये शिरतो. डॉक्टर काहीतरी प्रश्न विचारत असतात. त्याचं तिकडे लक्षंच नसतं. जमेल तशी उत्तरं देतं असतो तो फक्त.

"मेजर डिप्रेशन" चा शिक्का त्याच्या माथी मारला जातो. रंगीबेरंगी गोळ्यांचं पुडकं त्याच्या हाती थोपवण्यात येतं. त्याला कशाचंच काही भान राहिलेलं नसतं. अजूनही डोळ्यापुढची ती आणि तिची स्कूल-बॅग हटत नसते.

त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नसते त्यांची.

आपण मात्र वेडे झालेलो आहोत ही खात्री पटलेली असते आता त्याला..


Blogger Templates by Blog Forum