३२. काल रात्री..

काल रात्री तुफान पाऊस पडला इथे.

खिडकीच्या आतून,
तावदानावरचे ओघळलेले थेंब पाहताना,
काहीतरी जळत होतं खोलवर.

तुझ्यासारखं चिंब भिजावसं वाटलं अनेकदा.
पण त्याची राख होऊ द्यायला,
धजावलं नाही मन.

नकळत खिडकी उघडली तेव्हा,
दोन चार थेंब,
ओघळलेच हातावर.
कसल्याश्या तंद्रीतून चटकन भानावर आणत.

नाही म्हटलं तरी,
खिडकी बंद करणं,
एवढंच हातात होतं मग.

तो मात्र कोसळत राहिला रात्रभर..

३१. वाट..

आठवतंय तुला?

घनगर्द काळ्याकुट्ट अंधारात,
तुझा हात हातात घेऊन,
मोजून पावलं टाकताना,
हरवून गेलेलो आपण.

कुठुनसा असंख्य काजव्यांचा थवा,
क्षणार्धात सर्वकाही उजळवत,
घेऊन गेलेला आपल्याला,
रेतीभरल्या त्या अज्ञात वाटेवर.

समिंदरावर सांडलेल्या पार्‍याची,
पखरण करणार्‍या अल्लड लाटांचा,
अव्याहत गुंजणारा खळखळाट,
मनभर मुरवत पहुडलेलो आपण,
पौर्णिमेच्या चंद्राच्या उबदार कुशीत.
कधीही न विलगण्यासाठी..

आताशा ती वाट,
काटयांमध्ये कुठेतरी हरवलीय म्हणे..

आजही एखादा चुकार काजवा,
आपलं सर्वांग पेटवत,
शोधत असतो तिच्या खुणा.
रात्रभर.

मागत असतो शेवटचं देणं.
काट्यांपलिकडची ती एक बंदिस्त लाट,
अन् पौर्णिमेच्या चंद्राचा एक छोटासा कवडसा..

३०. निद्रिस्त..

आठवणी.

मनाच्या एका खोलवरशा कप्प्यात,
अलवार सांभाळून,
अपरिहार्यतेचं कुलूप लावलं की,
साचत राहतात फक्त,
एकावर एक.
थरावर थर.
निद्रिस्तशा ज्वालामुखीसारख्या..

उष्मा वाढतच राहतो,
तडजोडीचा.
कमजोरीचा.
असहायतेचा.
कायमच परीक्षा घेत राहतो,
सहनशीलतेचा.

एका असह्य क्षणी,
गळून पडतं सगळं काही..

वर्षानुवर्षे धुमसलेली फुकी तडजोड,
निद्रेतून जागवते हा ज्वालामुखी,
आपलं अक्राळविक्राळ रौद्ररूप दाखवत,
सगळं काही क्षणात विध्वंस करत,
मागत असते हिशेब,
आजवरच्या तगमगलेल्या क्षणांचा..

सोड,
माहिती आहे ना तुला सगळं?
मग राहू दे ना..

इतरांच्या दु:खावर,
स्वत:चे स्वार्थी इमले बांधणं,
तुला कधीच जमलं नाही.
जमणारं ही नाही.

एकंच हातात आहे तुझ्या.
मारून टाकायचं सगळं.
तुझ्या हृदयातलं..

अखंड तेवत राहणारा
निद्रिस्त ज्वालामुखी,
पूर्णपणे म्रूत होईपर्यंत..

सगळंच..

२९. सडणं..

एखादं अंग सडलं की,
कापून टाकण्यातच 'शहाणपण' असतं.
इतरांच्या लेखी.

स्वत:चाच अविभाज्य भाग,
इतक्या सहजासहजी तोडला जातो,
तेव्हा शरीराच्या वेदना बधीर होवून जातात.
हृदय मात्र करवतलं जात असतं आतमध्येच.

कापून कचर्‍यात फेकून दिलं की,
समाधान असतं सर्वांच्या मनी,
एक जीव वाचवल्याचं.
क्षुल्लक सडलेल्या अंगाच्या बदल्यात.

एके काळी जे आपलं होतं,
ते मरेपर्यंत कधीच आता असणार नाही,
ही जाणीवच थिटी करून टाकते मात्र,
त्याच्या जगण्याची उमेद.

फरक काय पडतो?
शेवटी सडलेलंच होतं ना सगळं काही?
नाकं मुठीत धरून दुर्गंधी सोसण्याशिवाय,
तुझ्यासाठी हा पर्याय बराच नाही का?

ठेच तर तुलाच लागली होती..
तूच वेळेवर लक्ष नाही दिलंस..

शेवटी दोष पूर्णपणे तुझाच..

२८. स्वप्न..

धुक्याची दुलई पांघरून,
साखरझोपेत पहूडलेल्या शिखरांना,
हळूच स्पर्शत जाणारा,
शिरशिरी भरवणारा वारा,
अन् सोबतीला पर्जन्यधारा.

अर्धोन्मिलीत पहाटेच्या,
किलकिल्या डोळ्यातून,
टपटप पडणार्‍या गारा वेचण्याची,
तुझी अल्लड कसरत.

ओंजळभर गारा जमवून दमल्यावर,
दूरवर दिसलेला तुला एकटाच तो,
अन् तिथेच जायचंय मला,
म्हणून अडून बसलेली तू.

तू असा लडिवाळ हट्ट केला की,
नाही हा शब्दच नाहीसा होतो बघ.
त्या शुभ्र ढगाच्या,
पिंजलेल्या मखमलीवर,
अलगद झेपावून,
मनमुराद हुंदडतो आपण,
त्याचा सगळा पाऊस संपवेपर्यंत.

तुझा एकुलता एक ढग,
बिचारा बरसून थकून गेला की,
हळूच त्याच्या एका सरीला धरून,
उतरतो उंच देवदार वृक्षाच्या शेंड्यावर.

तुझी खोडी काढण्याची सवय,
अजून जात नाही बघ.
तुझ्या चंद्राच्या नाजूक गालावर,
हळूच एक टिचकी मारून,
बिचार्‍याला खडबडून जागं केलं की,
सुळकन उतरत जातो आपण,
तुझ्या इवलुश्या कौलारू घराच्या चिमणीत.

तुझा चंद्र पण एव्हाना,
तुझ्या खोडीस दाद देत,
हसत असतो छानशी खळी पाडत.

पावसात चिंब भिजून,
तू कडकडून हुडहुडली असतेस.
तुझी कंपणारी सुबक काया,
विरघळून टाकते अंतर्बाह्य.
माझं सगळं शरीर एकवटलेलं असतं,
तुला सामवयाला डोळ्यात.

मस्त फायरप्लेस पेटवून देतो मग,
अन् तुझ्या आवडीची गझल रेकॉर्ड.
फायरप्लेसच्या तडकत राहणार्‍या ज्वाळेबरोबर,
हृदयातही वाढलेली असते,
थोडी थोडी धडधड.

स्कॉचचे दोन पेग भरून,
चियर्स! म्हणत,
पाहत राहतो फक्त तुझ्या डोळ्यांत.
स्कॉच जास्त धुंद की तुझे डोळे?
कठीण प्रश्न आहे खरंच!

नकळत ओठ खोडी करायचा प्रयत्न करतात,
तुझ्या गालावरची लाली टिपण्याचा.
तू वेडा आहेस म्हणत,
लटकेच वळतेस,
अन अलगद सोफ्यावर रेंगाळतेस.
शुभ्रशी चादर ओढून.

स्कॉचचा एक घोट घेत,
तुझ्या मोहक तनूच्या धुंदीत,
शांत पहुडून राहतो मग मी,
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून.
तुही अलगद कुरवाळत असतेस,
माझ्या चेहर्‍यावरची फितुर बट.

उष्णगरम श्वास मिसळत राहतात एकमेकात,
संथ गझलेच्या लयीत.
गुलाबी स्वप्न पडेपर्यंत..

ह्मम्म्म..
समजतंय आज,
काही स्वप्नं फक्त स्वप्नंच राहतात.
आपल्या हातात फक्त "पाहणं"च असतं.
आयुष्यभर..

२७. रात्र..

रात्र.
रोज नवं कोडं घेऊन आलेली.

रात्र.
मोहरलेली.
कण कण एकवटलेली.
गाढ मिठीत सुखावून,
तृप्त सुखात ओथंबलेली.

रात्र.
नशावलेली.
मैफिल सुरांची मढवलेली.
आर्त सूर लागून,
हळूच हातातून निसटलेली.

रात्र.
तळमळलेली.
आठवांचे क्षण ल्यालेली.
पहिल्या पावसात भिजून,
स्वत: मृदगंध हरवलेली.

रात्र.
मळभलेली.
झोंबणार्‍या वार्‍यात भरकटलेली.
खूप काही साचून,
आतल्या आतच गढलेली.

रात्र.
बावरलेली.
कसलाच अर्थ न लागलेली.
आसवांचे कढ पचवून,
तुझ्यासाठी हुंकारलेली.

रात्र.
विस्कटलेली.
परीसस्पर्शाच्या शोधात आसुसलेली.
तुझा स्पर्श होऊन,
सुवर्ण होण्यात स्वप्नाळलेली.

रात्र.
नाकारलेली.
कटू सत्य पांघरलेली.
हृदयाचे तुकडे करून,
मस्त निर्ढावलेली.

रात्र.
व्याकुळलेली.
अमाप आस लावलेली.
सरणावर तरी येशील म्हणून,
मरणाची वाट पाहिलेली.

रात्र.
जगणंच असह्य केलेली.

रात्र....

२६. वेध..

आजही स्पष्ट आठवतेय,
मनाच्या कोपर्‍यात कायमची कोरलेली,
ती पौर्णिमेची दुधाळ रात.

तुझ्या चहूबाजूला चांदणं सांडलेलं,
अन तुझ्या सख्या चंद्राने,
लख्ख उजळवलेला तुझा सावळा चेहरा.
फक्त माझ्याचसाठी.

तुझ्या प्रेमळ कुशीत पहूडून,
काळ्याभोर डोळ्यांतल्या चांदण्या पाहत,
विचारला होता एक साधाचसा प्रश्न,
तुझ्याच चंद्राच्या साक्षीनं.

खरं सांग,
मला कधीच कधीच विसरणार नाहीस ना?

खळखळून हसलेलीस तू तेव्हा,
अन् वास्तवाच्या दाहकतेचा चटका बसताच,
क्षणात अंतर्मुख झालेलीस.

वेडा आहेस तू म्हणे,
कितीही काही झालं तरी,
मी तुला कध्धी कध्धी विसरणार नाही.

आपल्या वाटा वेगळ्या झाल्या जरी,
माझं मन घेत राहील वेध तुझा कायमच.
माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत.
पृथ्वीतलाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात
असलास जरी तु.

तुच बघ ना वेड्या,
शेवटी माझा चंद्र आहे तरी कशाला?

आज फार सरसरून आठवण आली तुझी,
अन् नकळतच आसमंतात नजर गेली,
तुझा चंद्र मात्र काळ्याकुट्ट ढगांनी
कधीच गिळून टाकला होता.

अंग शहारून आलं एकदम.
तुझ्या चंद्राला ढगांच्या तावडीतुन सोडवून,
गच्च पकडून विचारलं.

खरं खरं सांग अगदी,
ती विसरून गेलीय काय रे मला?
तिच्या मनाने वेध घेणं सोडून दिलंय का माझा?
खरंच सांग ना रे?
अगदी खरं.
शेवटचंच.

तुझा चंद्र पुरता निस्तेज झाला,
अन ढगांआड लपताना एवढंच म्हणाला,
कळतंय रे मला सगळं,
पण मी तरी काय करू?

कसलंच उत्तर न देण्याची,
सक्त ताकीद आहे रे मला..

Blogger Templates by Blog Forum