११. तो..

त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नाहीए. त्याला मात्र त्याचं काही वाटत नाही. विचित्र म्हणा वेडा म्हणा की आणखी काही म्हणा.


त्याच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस सारखाच आहे. तो सकाळी उठतो. आरश्यात पाहिलं की तो नेहेमीप्रमाणे खरं बोलायला चुकत नाही. अरेच्या दाढीचे खुंट कितीतरी वाढलेत. डोळ्याखाली पण काळी वर्तुळं जमायला लागलीत. कपाळावर आठ्यांची गर्दी वाढतच चाललीये. ओठ काळे पडत चाललेत. सिगरेटी कमी फुंकल्या पाहिजेत लेका. त्वचा पण कशी सुरकुतल्यासारखी झालीये. ह्म्म्म्म.. जाऊदे मरूदे सालं. गेलं उडत.  तसाच घाईघाईत आवरतो तो ऑफीसला जाण्यासाठी. कपड्यांनी तर धोबी कधी पाहीलेलाच नसतो. त्यातल्या त्यात कमी मळलेले आणि कमी सुरकुतलेले कपडे तो डकवतो. चपलेचा अंगठा पण तुटलाय साला. काय फरक पडतो तसाही? कोण बघणार आहे आपल्याला? पळत पळत बस पकडत तो ऑफीसला जातो. ऑफीसमधल्या पोरी आज पण कसला अवतार करून आलंय बावळट ध्यान म्हणत फिदफिदत असतात. त्याला कशाचं काही वाटत नाही. हसायचं आहे तर हसा लोकहो. मला कसली तमा नाही. दिवसभर डोकं बुडवून काम करायचा प्रयत्न करतो तो. गडद अंधार पडल्यावर घरी येतो. काहीबाही पोटात ढकलतो. झोपायचा प्रयत्न करतो. रात्री त्याला कितीही काही केलं तरी झोप लागत नाही. रात्री त्याच्याशी जीवाभावाचं बोलायला ही कोणी नसतं. मग पहाटे २-३ वाजेपर्यंत तो नुसता झोपेची वाट पाहतो. सिगरेट वर सिगरेट फुंकत आयुष्यावर विचार करत बसतो तो.


आजकाल त्याला कशाचं सुख वाटत नाही, आणि दु:ख ही वाटत नाही. एखादी मनासारखी गोष्ट घडली, तर त्याला कडकडून आनंद होत नाही. कधी गालभरून हसू त्याच्या चेहर्यावर उमटत नाही. मनाविरुद्ध काही घडलं तर वाईटही वाटत नाही. जे चाललंय ते चालू दे. मला काही घेणंदेणं नाही अशी अवस्था झालीय त्याची. कधी कधी तर त्याला असं वाटतं की तो सर्व भाव-भावना गमावून बसलाय. बधीर झालाय त्याचा मेंदू. खरंच काहीतरी तर वाटायलाच पाहिजे ना कसल्याही परिस्थितीत. सुख, दु:ख, राग, लोभ, मत्सर. काही तरी नक्कीच. दगड झालाय की काय आपला? अमानुष झालोय आपण? हा प्रश्न पडल्यावर मग त्याला एकदम भीती वाटते. खरंच जर असं काही झालं असलं तर? भावनाच जर नसतील तर मी माणूस तरी आहे का? आणि तसं जर असेल तर आपल्यात आणि यंत्रमानवात काय फरक राहीला मग? जर मी माणूसच्या व्याख्येतच बसत नसेल तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? जे काही चालू आहे ते तसंच यांत्रिकपणे सगळं चालू द्यायचं का?


असं काही वाटायला लागलं की तो एकदम तात्विक आणि शास्त्रीय पातळीवर जाऊन पोचतो. खरंच माणसाच्या मनात निर्माण होणार्‍या भावना म्हणजे तरी काय असतं नक्की? मेंदू मध्ये त्या त्या वेळी स्त्रवणारी रसायनंच ठरवतात ना सगळं? आनंद आणि दु:ख आणि इतर भावना म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या मेंदूने दिलेली प्रतिक्रियाच नाही का? आवडणारी गोष्ट घडली की आनंद, नाही आवडलं की वाईट वाटणं हे सगळं त्या रसायनांवरच तर अवलंबून आहे की? त्याला एकदम Human Anatomy आठवायला लागते. सेरोटोनीन, डोपामीन आणि काय काय.. शेवटी यांच्याच तर हातात सगळं काही आहे. आणि नॉर्मल माणूस म्हणजे तरी नक्की काय असतं? वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मेंदूची कन्वेन्षन नुसार येणारी प्रतिक्रिया म्हणजे नॉर्मल माणसाचं लक्षण. तसं जर नाही झालं तर तो माणूस अबनॉर्मल. उद्या कोणी मेलं तर वाईट नाही वाटलं म्हणजे अबनॉर्मल, आणि परमोच्च गोष्ट घडली, तर छान नाही वाटलं म्हणजे पण अबनॉर्मलच? मग आपलं घोडं कुठं शेण खातंय नक्की? कसल्याही परिस्थितीत जर आपल्याला कधीच काही वाटत नसेल, जर आपला मेंदूच हे काम नीट करत नसेल, तर मग प्रॉब्लेम आपल्यातच नाहीये का? असा आपला मेंदू दगा देत असेल, तर आपण वेडे होत  चाललोय की काय? खरंच शहाणा आणि वेडा यात फरक तरी कसा करतो आपण? जो नॉर्मल सिचुयेशन मधे नॉर्मल वागत नाही तो वेडा असंच तर परिमाण आहे. आणि शहाणी माणसं पण वेडी झालेली किती तरी उदाहरणं आहेतच की. त्यांच्यात नक्की कसा बदल घडत जात असेल? कदाचित आपण पण त्याच मार्गावर तर नाही ना लागलो? असले अभद्र विचार डोक्यात आले की तो अस्वस्थ होवून जातो. आपल्या डॉक्टर मित्रांना विचारतो, खरंच नॉर्मल माणूस आणि तोच माणूस जेव्हा वेडा होतो, तेव्हा काहीतरी तर बदल जाणवत असतील ना? काय लक्षणं असतात नक्की अश्या वेळी? कसं ठरवलं जातं की एखादा वेडा होत चालला आहे ते? असे गंभीर प्रश्न विचारले की त्याच्या मित्रांना आयतं कोलीतच मिळतं. त्याचीच उलटतपासणी सुरु होते. तुला असं वाटतंय काय खरंच? वेडा आहेस का तू? असं म्हणून सर्व काही हसण्यावारी उडून जातं..


घरी जाण्याचंही टाळतो तो आजकाल. घरी जाऊनही काही बरं वाटत नसेल तर न गेलेलंच बरं. परवा असाच घरच्यांच्या आग्रहाखातर घरी गेलेला तो. आई प्रेमाने त्याची विचारपूस करत होती. केस फार रूक्ष झालेत म्हणे तुझे. तेल लावून मसाज करते. केसाला हात लावताक्षणीच म्हणाली ती, अरे तुला तर टाळूवर टक्कल पडायला लागलंय. फार विरळ झालेत केस. आणि पिकायला पण लागलेत कितीतरी. फार त्रास होतोय का नोकरीचा? नसलं झेपत तर सोडून दे सरळ. तो एकदम गप्प. मनात काय चाललंय हे काय सांगणार तिला. काहीतरी थातूरमातूर सांगून वेळ निभावून नेली त्याने. आता तर घरी जाण्याचं ही टाळायला लागला तो, काहीबाही कारणं सांगून. कश्याला उगाचंच घरच्यांच्या जीवाला घोर.

सगळ्याच गोष्टीतून मन उडालंय त्याचं. अगदी माणसाची प्राथमिक गरज भूक, ती पण त्याला लागत नाही. चुकून कधी काही खावंसं वाटलं तर सिगरेट फुंकतो तो. मग भूक ही कशी मरून जाते. अधूनमधून मित्रांकडे जातो तो अगदीच नाही करमलं तर. मित्रही त्याचे चरसी. अरे तुला फार बोअर होतंय का लाईफ मधे? गांजा मारलायेस का मग कधी तू? गजानन महाराज पण मारायचेच की? लई भारी वाटेल तुला.. तो ही मग म्हणतो, चला हे ही करून पाहूया. मस्त मित्रांसोबत दारू पिऊन गांजा मारतो तो. कधी नव्हे ते थोडंफार बरं वाटत असतं. अगदी हवेत गेल्या सारखं. तरंगल्यासारखं. महाराज गांजा मारायचे ते उगाचंच नाही बहुतेक? अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते की.. गांजा मारल्यावर मग त्याला कडाडून भूक लागते. अधाश्यासारखं तो २-४ दिवसांचं एकदाच खाऊन घेतो. पोट तडेला लागेपर्यंत. मग मित्राच्या दहाव्या मजल्याच्या गॅलरीत जाऊन उभा राहतो. आठवणींचं मंद वारं वाहत असतं. तो खाली पाहतो. भरून वाहणारा रस्ता आता एकदम शांत झालेला असतो. त्याच्या मनात विचार येतो, जर मी आत्ता खाली उडी मारली तर काय होईल? हात मोडेल? पाय मोडेल? की कपाळमोक्ष होईल? कदाचित मरून पण जाईन मी? खरंच नक्की काय होईल बरं? तसंही मरून जरी गेलो तरी कुणाला काय त्याचं? थोडं वाईट वाटेल सर्वांना. चार दिवस सगळे अश्रू ढाळतील, आणि नंतर पहिले पाढे पंचावन्नच नाही का? खरंच एकदा करून पाहायला काय हरकत आहे? अगदी कठड्यापाशी जाऊन उभा राहतो तो, पण खाली उडी मारायचं धाडस होत नाही. च्यायला, आपण पण नेभळट आहोत अगदी, आत्महत्या करायची पण आपली कुवत आणि लायकी नाही. तसाच पराभूत आत येवून तो अजून गांजा मारतो. आता मात्र तो पुर्णपणे चंद्रावर गेलेला असतो. काय चाललंय हे ही त्याला कळत नाही. तसाच फरशीवर लोळत तो गाढ झोपी जातो.

मित्रांना कधी काही सांगायचं म्हटलं तर त्यांना ह्याचे मौलिक विचार झेपतच नाहीत. चुकून एखाद्याला थोडंफार कळालं तर तो quarter-life crisis असं निदान करून मोकळा होतो. तू एकटा आहेस म्हणून असं बरळतोस, लग्न कर म्हणजे सगळं ठीक होईल वगैरे. घरचेही आता त्याच्या पाठीमागे लागलेले असतात लग्नासाठी. कितीही डोकं गंजलं असलं तरी त्याला एक माहिती असतं. त्याचं स्वता:वरंच प्रेम नाहिये. आणि जो माणूस स्वता:वर प्रेम करू शकत नाही, तो दुसर्या व्यक्तीवर तर कधीच करू शकणार नाही. असं जर असेल, जर भविष्यात जी कोणी त्याची सहचारिणी बनेल आणि तो तिच्यावर प्रेमच करू शकणार नसेल तर लग्न तरी का करायचं? कशाला त्या बिचारीच्या आयुष्याशी खेळायचं? हे लग्न म्हणजे तडजोडच नाही का एक प्रकारची? असले क्रांतिकारी विचार तो कुणाला सांगू शकत नाही. कारण त्याला माहीत आहे की कुणाला समजणारंच नाही हे. यावर सोपा उपाय म्हणून जी कोणी मुलगी त्याला घरचे दाखवतात, ती कितीही चांगली असली तरी तो काहीतरी उणं शोधून काढतो. आजचं मरण उद्यावर ढकलत राहतो.


कितीही माथेफोड केली आणि कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यात बदल होतंच नाही. सगळं असह्य झाल्यावर तो ही हात टेकतो. शेवटचा पर्याय निवडतो. Psychiatrist. कुठूनतरी एक प्रख्यात Psychiatrist शोधून काढतो. डॉक्टरांना भेटायची वेळ ठरते. त्याच्या आधी कितीतरी पेशंट्स हजेरी लावून असतात.. किमान तीस एक तरी. डॉक्टर फारंच हुशार असले पाहिजेत असा सहज विचार चमकून जातो त्याच्या डोक्यात. आपला नंबर येण्यापर्यंत बराच फावला वेळ असतो त्याच्याकडे. सगळीकडे तो नजर फिरवतो. सर्व स्तराची माणसं त्याला दिसायला लागतात. खरंच काय त्रास होत असेल ह्यांना नक्की? आपल्याला जसं काही वाटतंय तसंच त्यांना ही होत असेल का? की आपल्या पेक्षाही काही पटीने अधिक? देवच जाणे.

अचानक त्याची नजर तिच्यावर स्थिरावते. स्कर्ट आणि टॉप घातलेली ती. दिसायला अतिशय देखणी. आत्ताच बाहेर पडली तर चार माना नक्कीच परत वळतील अशी. बहुतेक तिच्या बाजूला तिची आई बसलेली असते, आणि शेजारच्या खुर्चीवर स्कूल-बॅग.. स्कूल-बॅग?? म्हणजे १५-१६ च्या पुढे नक्कीच वय नाही तिचं. आणि या वयात Psychiatrist?? काय झालं काय असेल तिच्या आयुष्यात की तिला जीवनाच्या ह्या वळणावर Psychiatrist ची गरज पडावी? हसण्याखेळण्याचं, बागडण्याचं, गोड गुलाबी स्वप्नं रंगवण्याचं वय हे! आणि या वयात ही पायरी चढावी लागतेय तिला? तिच्या आयुष्यात काय घडलं असेल याची कल्पनाच करवत नाही त्याला. डोकं एकदम गरगरायला होतं त्याचं. तेवढ्यात तिला आत बोलावलं जातं. थोड्या वेळाने shock-treatment साठी दुसर्या रूम मध्ये नेलं जातं. दहा मिनीटं शांतता. आणि मग ती बाहेर येते, झोलकावे खात. आई कशीबशी तिला सावरत असते आता. डोळे एकदम लालभडक झालेले असतात तिचे, सगळी चमक हरवून बसलेले. दिशाहीन. अर्थहीन. आई कसंबसं तिला सांभाळत चालू लागते. त्याचं डोकं एकदम सुन्न होवून जातं. बधीर. गलितगात्र. अचानक त्याचं नाव पुकारलं जातं. तो गडबडून आत कॅबिन मध्ये शिरतो. डॉक्टर काहीतरी प्रश्न विचारत असतात. त्याचं तिकडे लक्षंच नसतं. जमेल तशी उत्तरं देतं असतो तो फक्त.

"मेजर डिप्रेशन" चा शिक्का त्याच्या माथी मारला जातो. रंगीबेरंगी गोळ्यांचं पुडकं त्याच्या हाती थोपवण्यात येतं. त्याला कशाचंच काही भान राहिलेलं नसतं. अजूनही डोळ्यापुढची ती आणि तिची स्कूल-बॅग हटत नसते.

त्याचे मित्र त्याला विचित्र समजतात. अजून वेडा म्हणण्यापर्यंत मजल गेलेली नसते त्यांची.

आपण मात्र वेडे झालेलो आहोत ही खात्री पटलेली असते आता त्याला..



त्याच्या जन्माच्या किती तरी आधी पासून बाप दारुडा म्हणून सुप्रसिद्ध. हा बाळूत्यात, आणि त्याचा बाप दारूच्या गुत्त्यात. घरात सगळ्यात लहान आणि आधीच्या सगळ्याच पोरी म्हणून बापाचा लाडका तो. मोठा झाल्यावर त्याने असं ही ऐकलं होतं की हा नवसाचा दिवटा झाला म्हणून बापाला इतका आनंद झाला होता की पोराच्या आधी बाटलीचं तोंड बघितलं होतं बापाने. आणि मग अशी ही बाटली त्याच्या पाचवीला कायमचीच पूजली गेली. दारूचा गुत्ता म्हणजे काय हे समजण्याच्या कितीतरी आधी पासून बापासाठी दारू वाहिली त्याने. बापाची तलफ इतकी जोरदार होती, की कधीकधी दिवसा शाळेत बसलेल्या त्याला त्याची माय खोटंनाटं कारण सांगून घरी घेऊन यायची. आपल्याला मावशीच्या गावाला जायचंय आत्ता म्हणून वगैरे. खरं खोटं समजायच्याही पलीकडचं वय ते. एकदम हुरळत घरी यायचा तो माय सोबत गावाला जायचं म्हणून. घरी आल्यावर मात्र त्याच्या हातात रोज ठरलेली हिरवी वॉटरबॅग दिली जायची, आणि बापासाठी दारू आणायला गुत्त्यावर जायचंय तुला, हे सांगताना माय चा कंठ कधी भरून यायचा ते त्यालाही कळायचं नाही. अगदी हिरमसून आणि चिडून तसाच तो गुत्त्यावर जाऊन बापासाठी दारू घेऊन यायचा. मायचा जीव कितीही तीळ तीळ तुटत असला तरी ती बिचारी काय करू शकत होती? दारू नाही मिळाली तर घरात राडा ठरलेलाच. तो जसा जसा मोठा होत गेला, तसं तसं घरात भांडण, आरडाओरडा, गोंधळ, हाणामारी हे सगळं अगदी रोजचंच झालं त्याला. अंगवळणी पडून गेलं सगळं. बाप दिसला की प्रेम वाटण्याऐवजी कायम तिरस्कार, भीती, घृणा वाटायला लागली त्याला. बाप म्हणजे दारू, बाप म्हणजे त्रास आणि बाप म्हणजे त्याच्यापासून दूर कसं पळता येईल एवढंच त्याच्या मनावर कायमचं कोरल गेलं. तो दहा वर्षाचा असताना बाप असाच खूप दारू पिऊन मरून गेला. बाप मेला म्हणून थोडंसं वाईट वाटलं त्याला, पण कायमची पीडा गेली म्हणून कुठेतरी मनाचं समाधान पण नक्कीच झालं त्याच्या. आपण आपल्या बापासारखं दारूचं व्यसन लावून आयुष्याची राखरांगोळी करायची नाही हे त्याच्याही नकळत त्याने ठरवून टाकलं मनाशी..
============================================================

मित्र - "चल बे, आज दारू पिऊयात. परीक्षा संपलीये. लेट्स एन्जॉय.."
तो - "अरे बाबा, मी दारू पीत नाही. मला आवडत नाही दारू."
दुसरा मित्र - "अरे कसला झंडू आहेस बे तू, च्यायला दारूने काय होतंय? जरा चाखून तर बघ. मस्त वाटेल एकदम."
तो - "अरे पण, दारू वाईट आहे, एन्जॉय करायला दुसरं काही नाहीच का?"
मित्र - "अबे चमन, दारू ही अशी गोष्ट आहे, जी एन्जॉय करायला लागला की दुसर्‍या कशाचीच गरज पडत नाही."
तिसरा मित्र - "आणि तू तर असा बोलतोय की आपण काही पाप करतोय, सगळं जग पितं दारू. आज काल तर कार्ट्या पण पितात. स्टेटस सिम्बॉल आहे ते. तू नाही पिलास तर शामळू म्हणतील तुला सगळे."

त्याच्या नाही नाही म्हणण्यात आणि बाकीच्यांच्या एवढ्या सगळ्या भाषणबाजीत त्याच्यासाठी पेग भरला पण गेला कधीच. त्यानेही मग हो नाही म्हणत लावला तोंडाला. एकदम उग्र घाणेरडा दर्प बसला नाकात त्याच्या. पहिल्या घोटातच ओकारी आल्यासारखं झालं अगदी. गळ्यापासून अगदी आतड्यापर्यंत गरम गरम वाटत गेलं. आणि थोड्या वेळाने त्यालाही एकदम मस्त वाटायला लागलं. खरंच दारू म्हणतात तेवढी वाईट तर नक्कीच नाही. उलट रिलॅक्स वाटतंय. सगळं टेन्शन गेल्यासारखं. उगाचच आपण एवढा बाऊ करत होतो. कधीमधीच घेणार आपण तसंही. रोज पिऊन थोडेच पडणार आहोत बापासारखे? आणि मग पेग वर पेग रिचत गेले त्या रात्री.. फेसाळणार्या सोडाच्या बुडबुड्या सारखं मनाशी ठरवलेलं सगळं मनातंच विरून गेलं..

मग अश्या कित्येक रात्री येत गेल्या. कधी परीक्षा संपली, कुणाचा हार्टब्रेक झाला, कुणाची गाडी आली, कुणाला प्रोफेसरने झापलं, बोअर झालं, अगदी काहीच कारण नाही, तर काहीच करायला नाही म्हणून पण पेग रिकामे झाले.

============================================================

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचा फोन खणखणला. पाहतो तर बहिणीचा कॉल. उचलावा की नाही हा प्रश्न पडला त्याला. नाही उचलला तरीही परत काळजीत पडतील सगळे. तसाच धडपडत बाटली बाजूला सारत तो फोन घेऊन गॅलरी मधे आला.

"हेलो, बोल ना, काय म्हणतेस?"
"काही नाही, सहजच फोन केलेला आज, कसं चाललंय तुझं? काय करतोयेस?"
"अगं काही नाही, असाच आत्ताच ऑफीस मधून आलोय, बसलोय रूम मधे, काही विशेष नाही." - त्याचा मद्यधुंद आवाज.
"जेवला की नाही अजून? बराच वेळ झालाय?"
"उम्म्म.. नाही अजून.. जाईन आता थोड्याच वेळात.."
त्याचं काय चाललंय हे तिला समजायलाही वेळ लागला नाहीच.. शेवटी त्याचीच बहीण ती..
"पार्टी चालू आहे का आज पण?"
"ह्मम्म्म.. थोडीशी.." त्याचा ओशाळवाणा सूर.
"अरे काय चालूये काय तुझं? आम्ही पण समजू शकतो, तुम्हाला फार कामं असतात. वीकेंडला एक दोन दिवस ठीक आहे, आता तर वीकडेजला पण पार्टी?"
"अगं असंच, प्रमोशन झालंय, त्यामुळे जरा जास्त कामं पण आहेत, टेन्शन पण आहे जरा.."
"अरे पण? इतकं काय टेन्शन असतं तुम्हाला? आम्ही पण जॉब करतोच ना? आम्हाला नसतं का टेन्शन? आम्ही तर नवरा पोरं घरंदारं सांभाळून जॉब करतो ना? तुमचं पण जगाच्या आक्रीतच असतं. जरा कुठे खुट्ट झालं की लगेच लागले दारू प्यायला. आम्ही करतो का असं? आम्हाला काही त्रास झाला की जावं का आम्ही पण दारूचे अड्डे शोधत लगेच?" - बहिणीचा त्रासीक सूर.
"तसं नाही गं.. पण आज असंच जरा.. जास्त नाही घेत आणि.. थोडीशीच चालूये.."
"ते काय असेल ते असो. अरे पण जरा लिमीटमधे कराव्यात सगळ्याच गोष्टी. आम्हाला पण कळतं की आजकाल सगळेच घेतात. आम्हीही ते आता नसत पटलं तरी मान्य केलंच आहे ना? घ्या, पण जरा प्रमाणात घ्या. अतिरेक नको कोणत्याच गोष्टीचा."
"ह्मम्म्म..."
"आणि उद्या हेच जर वाढलं तर समाज काय म्हणेल? दारुड्याची पोरं शेवटी दारूडीच निघाली?"

समाजाचं नाव घेताच त्याचं का कोण जाणे टाळकं हाललं..

"हे बघ.. मी समाज वगैरे काही मानत नाही. मी काय करतो किंवा काय नाही ह्याचं समाजाला काय घेणंदेणं? आपण एवढे हलाखीत दिवस काढले, तेव्हा कोणता समाज आला होता धावून पुढे आपल्यासाठी? तेव्हा एक बच्चमजी पण पुढे आला नाही मदतीला. आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे, तर समाजाला काड्या घालायचा काय अधिकार आहे? समाज गेला खड्ड्यात माझ्यासाठी.. मी काही जुमानत नाही कोणाला.."
"अरे पण, किती ही नाही म्हटलं तरी समाजाशी फटकून नाही वागता येत.. लागेबांधे जोपासावेच लागतात.. "
"गेला उडत समाज.. आणि आम्ही काय करतो तरी असं? थोडी फार घेतोच ना? दारू वाईट असं फार लहानपणापासून बिंबवलं गेलं आहे आपल्या मनावर.. दारूने संसार उध्वस्त होतात वगैरे.. लोकं दारू पिऊन गटारात लोळतात हाच आपला समज आहे.. पण तसं काही नसतं.. रिस्पोन्सीबली दारू पिणारे पण बरेच असतात आणि आहेत. आणि आम्ही पण त्याच कॅटेगरीमधे आहोत. गटारात लोळणार्यातले नाही.. "
"बरं बाबा.. तुझ्याशी कोण वाद घालणार? आपल्या सर्व भावंडात तूच अतीहुशार आहेस.. तुला जे योग्य वाटेल ते कर, पण प्रमाणात. एवढ्या हिकमतीने आपण सगळं साध्य केलंय, समाजात आपली प्रतिष्ठा आहे आता, आणि बापासारखे दिवस पुन्हा नको पुढे आणूस म्हणजे मिळवलं.. "

शेवटी कितीही दारूचं समर्थन केलं तरी बहीण काय बोलतेय हे अगदीच खोटं नव्हतं आणि हे त्याला ही पटतच होतं.. तो ही निरूत्तर झाला मग तिच्यापुढे..

============================================================

आज अडीच महिने होत आले त्याला सलग रोज दारु पिऊन. बापात आणि त्याच्यात आता काहीच फरक राहिला नव्हता. बाप देशी ढोसायचा तर हा विदेशी ढोसतो एवढंच काय ते वेगळं. सगळंच झुलत राहिलेलं त्याच्यासाठी. त्याचं शरीर, मन, प्रेम, निर्णय, सगळंच.

तिची शेवटची भेट आठवली त्याला. डोळ्यांनीच सगळं बोलून घेतलं होतं त्यांनी त्या दिवशी. किती गाढ प्रेम आहे एकमेकांवर. दोघांनाही ते कळत असून मग नुसतेच निरर्थक गोष्टींवर बोलत राहिलेले ते, अगदी त्या बोलण्याकडे काहीच लक्ष न देता. मनाचा वेगळाच संवाद चाललेला, आणि त्यातच दोघांनाही गुरफटून जायचं होतं. कायमचं.

आणि आज तिने शेवटी सांगितलं त्याला..

"आपलं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी, आपण कधीच एक होवू शकणार नाहीत. कधीच शक्य नाहीये ते."

त्या दोन वाक्यात सगळंच संपून गेलं त्याच्यासाठी. इतके दिवस घोंघावणारं वादळ आज अचानक शांत गपगार झालं. काहीच उरलं नाही आता. सगळं कसं थिजून गेलं त्याच्यासाठी. डोकं इतकं सुन्न झालं होतं त्याचं की सगळं काही यांत्रिकपणे घडत होतं त्याच्या हातून.

घरी येवून नेहेमीप्रमाणेच त्याने पेग भरला. आज त्याला बुडून जायचं होतं त्याच्यात. जशीजशी रात्र चढत गेली, तसेतसे पेग वर पेग रिचत गेले मग फक्त.

अचानक त्याला कुठूनशी कुजबूज स्पष्टपणे ऐकू आली.
"दारुड्याची पोरं शेवटी दारुडीच निपजतात.."

आणि मग आज का कोण जाणे त्याला स्वता:च्या बापाबद्दल पहिल्यांदाच आत्मीयता वाटायला लागली..

९. मी माझा..

बहरूनी ऋतू गुलाबी
आज तरळत गेलो..
मी माझा एकटाच
नकळत वठत गेलो..

काय मागितलं होतं?
आणि काय पडलं दान?
मी माझा एकटाच
जिंकूनी हरत गेलो..

बेवारस या मढ्यात
उगाचंच फुंकीत प्राण..
मी माझा एकटाच
लचके तोडीत गेलो..

फुका आशा ही कशाची?
आजवर गोंजारत राहिलो?
मी माझा एकटाच
रोज मन मारीत गेलो..

फाटकीच झोळी माझी
कधी न भरणारी..
मी माझा एकटाच
तरीही भीक मागत गेलो..

काल होतं हे कुणाचं
उद्याला कुठे कशाचं..
मी माझा एकटाच
उभा जळत गेलो..

आसवांना ही आता
डोळ्यांची बंद कवाडं..
मी माझा एकटाच
बुडून मरत गेलो..

८. कदर ना जानी ना मोरा सैयाँ..


कित्येक दिवसातून पुन्हा थोडंफार बोलायला सुरूवात केलेली तिने.. पण त्याचा अहं आज त्याला काही स्वस्थ बसू देईना.. इतके दिवस तडफडतोय तिच्याशी बोलण्यासाठी.. तिला खरंच कळत नाही का? बोलू तर शकतेच ना ती? जग बोलू शकतं तिच्याशी आणि फक्त मीच का नाही? की तो जास्त गुंतू नये तिच्यात म्हणून तिने बोलणं बंद केलंय? काही का असेना? सगळं जणू कळत असूनही तो भयानक चिडला तिच्यावर.. अगदी सगळं काही तुटेपर्यंत.. तिने नेहेमीप्रमाणेच पडतं घेतलं.. अवाक्षर ही न काढता त्याला मनमुराद भांडू दिलं.. सगळं काही ओकून झाल्यावर तो ही थोडासा शांत झाला.. आणि तिच्या दोन प्रेमाच्या गोष्टीत त्याचा राग कधी वितळून गेला हे त्याचं त्याला ही समजलं नाही..

आणि मग तिने कायमचं जायची गोष्ट काढली.. तिचे ते शब्द वाचूनच त्याला उभं वारं सुटलं.. ही जाणार म्हणतेय ही कल्पनाच त्याला करवेना.. तिला बाहेर चाललोय सांगून कसंतरी तो ऑफीसच्या बाहेर पडला.. डोळे अगदी भरून आले त्याचे.. मनात काय चाललंय हे त्या निसर्गालाही कळून चुकलं होतं कदाचीत.. सुसाट वारा सुटला होता.. त्याला एकदमंच सगळं रितं रितं वाटायला लागलं.. भयानक पोकळी जाणवायला लागली.. आणि त्यातंच शोभाचं कदर ना जानी ना मोरा सैयाँ कानी पडत होतं.. बिनती करत हूँ.. पैयाँ परत हूँ.. फिर भी एक ना मानी मोरा सैयाँ.. शोभाचे आर्त सूर त्याचं काळीज चिरत गेले अगदी.. एकदम रडूच फुटलं त्याला.. तरी कसंबसं सावरत विमनस्क मनस्थितीतच तो नेहमीच्या टपरी वर पोचला.. टपरीवाल्यानेही समजुतीने त्याच्या हातात चहा आणि सिगरेट ठेवली.. एक दोन झुरके मारल्यावर तरी बरं वाटेल असा विचार करत होत तो.. पण सगळेच रुसले होते त्याच्यावर आज जणू.. काहीही केलं तरी आतून येणारे कढ थांबेनातच त्याचे.. खरंच इतकं भांडण्याची तरी काही गरज होती का हा प्रश्न पडला आता त्याला.. आज ती आहे, म्हणून भांडूही शकशील, ती पण पडतं घेईल, पण काही दिवसानंतर काय? ती जेव्हा नसेलच तेव्हा काय? ह्या विचारानेच त्याला कापरं सुटलं.. एक संपली की लगेच दुसरी सिगरेट शिलगावली त्याने.. पण जे काही काहूर माजलं होतं ते शांत होईना.. खरंच काय मिळवतोय तिच्याशी भांडून हे त्याचं त्याला ही कळेनासं झालं आता..

तसाच लडखडत तो परत ऑफीसमधे आला.. असं आपल्याला कुणी पाहू नये म्हणून एकटाच कॉन्फरन्स रूम मधे जाऊन बसला.. तिची जायची वेळ झालेली.. आता निघते म्हणाली ती.. आणि पुन्हा एकदा सगळं काही दाटून आलं त्याच्या मनी.. मला सोडून जाऊ नकोस असं एकदम अगदी खोलवरून म्हणावसं वाटलं त्याला.. कधीच सोडून जाऊ नकोस असं.. पण तिच्याही हातात काय होतं हा विचार करून मनाला आवर घातला त्याने.. शेवटी नाही राहवून तरी तो म्हणालाच तिला.. आज मला फार एकाकी वाटतंय.. तू जाऊ नकोस.. तिला ही जणू त्याच्या मनात काय चाललंय हे उमगत होतं.. पण तिचेही हात बांधलेले.. मी आहे तू मेसेज कर म्हणाली त्याला..

पडत्या फळाची आज्ञा पाळत लगेचच त्याने तिला मेसेज केला.. थोडं फार अवांतर बोलून झालं पण त्याला अजिबातच राहवेना.. डोळे एकदम भरून यायला लागले.. अनामिक हुरहूर दाटायला लागली मनी.. तसं तिच्या शिवाय त्याला समजून घेणारं होतं तरी कोण त्याच्या आयुष्यात? मग धडा करून तो म्हणालाच तिला.. फार भरून आल्यासारखं वाटतंय आज.. तिला ही त्याची अवस्था जणू कळून चुकली मग.. आपल्या परीने ती त्याची समजूत घालायचा प्रयत्न करायला लागली.. पण आज त्याचा बांध पूर्णपणे उन्मळून पडला होता.. कितीही प्रयत्न केला तरी आसवं गळायची थांबेनातच त्याची.. तसाच कसंबसं तिच्याशी बोलत राहीला तो.. आणि आता ऑफीसमध्ये थांबून हसं करून घेण्यात काहीच अर्थ नाही, हे समजून बाहेर निघाला.. वॉशरूममधे जाऊन कितीतरी वेळा तोंड धुवून झालं.. पण लालभडक डोळे त्याची साथ सोडत नव्हते.. तसाच सर्वांची नजर चुकवत कसातरी तो पुन्हा बाहेर पडला.. पुन्हा तीच टपरी आणि तोच चहा आणि सिगरेट.. तिचे काळजीचे मेसेज येतंच होते.. नको वाईट वाटून घेवू वगैरे वगैरे.. जितकी ती मेसेज करत होती, तितकेच त्याला आतून कढ फुटत होते.. शेवटी न राहवून तीच फोन करते म्हणाली.. इतक्या दिवसातून तिचा आवाज ऐकायला मिळणार होता त्याला.. पण तोच इतका रडवेला झाला होता की फोन उचलायचं ही धाडस होईना त्याचं.. तिला नको म्हणून त्याने सुटका करून घेतली कशीतरी स्वता:ची..

तसाच थोड्या वेळाने घरी आला तो.. पण अजिबातच करमेना त्याला.. मग अगदी मनसोक्तच रडून घेतलं त्याने.. चांगले डोळे सुजेपर्यंत.. मग त्याला थोडं बरं वाटलं.. भावनेचा भर जरा ओसरला होता.. तिलाही काही चैन पडणारी नव्हती.. वेळात वेळ काढून तिने उशिरा रात्री त्याला मेसेज केलाच.. त्याच्या ओसाड वैराण तहानलेल्या वाळवंटात वळवाचा पाऊसच पडत होता.. फार फार फार भाग्यवान वाटलं त्याला तेव्हा.. तीच आहे फक्त, जी कधीच त्याची साथ सोडणार नाही.. त्याने कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी.. हे त्याला पुन्हा नव्याने उमगत होतं आज.. अगदी भरून पावल्यासारखं वाटलं त्याला.. तिची आणि त्याची आयुष्यात भेट घडवून आणली याबद्दल मनोमन आभार मानले त्याने विधात्याचे.. आणि मग तिच्याशी बोलताना मनातलं मळभ कधी नाहीसं झालं हे त्याचं त्यालाच कळलं नाही..

७. मी खूप सुखी आहे गं..


मला तुला खूप सुखात पाहायचंय..
एवढीच माफक इच्छा होती ना तुझी?
तुला खरंच सांगतो आज
मी खूप सुखी आहे गं..

कसलाच आवाज नाहीये आता..
आहे ती फक्त मृत भयाण शांतता..
तू कधीच अबोल झालीयेस..
तुझ्याही नकळत..
आणि मीही त्याचा मूक साक्षीदार..

कसलेच रुसवे फुगवे नाहीयेत आता..
नाहीत कोणतेच हेवेदावे..
तडफड नाही.. तगमगही नाही..
नाकावरचा राग पण नाही..
आणि गोड गुलाबी शेवट पण नाही..

धुंद रात्री नाहीत..
तुझी आस पण नाही..
शब्दही नाहीत..
अन भास ही नाहीत..

मीलनाची अधीरता नाही..
विरहाची व्याकुळता नाही..
सत्यही नाही..
आणि स्वप्नही नाही..

पण तुला खरंच सांगतो
मी खूप सुखी आहे गं..

तुझी आठवण येत नाही असं नाही..
आणि ते मंतरलेले दिवस विसरलो असंही नाही..
पण नियतीनेचं ओरबाडलंय सगळं काही
आणि मी ही आता माझा राहिलो नाही..

मोरपिसी नाजूक आठवणी या आपल्या
जपून दडवून ठेवल्यात मी
फडताळाच्या कोपर्यातल्या..
न सापडणार्या पुस्तकाच्या पानांत..

पण कधीतरी काहीतरी शोधताना
चुकून हाती लागतं ते आठवणींच मोरपीस..
आकाशात फक्त काळेमिट्ट ढग
गोळा झालेले असतात अशावेळी..

निवडुंगासारखं काटेरी आयुष्य होतं माझं..
तुझ्या एका झुळूकेपायी..
ते ही बहरलं..
खोल दडपलेल्या उर्मीतून..
मोहकसं फूल उमलवून आतुरलं..

तो बहर ही संपून गेलाय कधीच आता..
काटेरीचं आयुष्य असतं निवडुंगाचं..
ह्याची कटू जाणीव करून देत..

पण एक सांगतो
मी खरंच सुखी आहे गं..

मनी उठनार्या भावनांच्या नरडीला..
कधीच नख लावलंय मी..
त्यांचा ही फक्त
निद्रिस्त ज्वालामुखी झालाय आता..

पण तू कधीच काळजी करु नकोस माझी..
मी खूप सुखी आहे गं..

वाटंच समांतर आखली होती त्याने तुझी माझी..
भाबडीच खटपट होती आपली तिला छेदायची..
हाती काय उरलं दोघांच्याही शेवटी?
भरकटलेले दिवस आणि
भिजलेल्या राती?

पण तरीही मी खूप सुखी आहे गं..

एकंच मागणं आहे आता..
तेवढं करशील माझ्यासाठी?
मी जरी नसलो उद्या तरी..
चुकून माझ्या सरणावरती
दोन टिपंही गाळू नकोस..

तुझ्या साठी काहीच करु शकलो नाही कधीच..
याची ती पोचपावतीच असेल मला..
गिळून टाक सगळं काही हसत
निदान माझ्यासाठी तरी..

खरंच..
तेव्हाच मी खूप सुखी असेन गं..
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धिचे कारण..
असं कोणीतरी सांगून गेला..

राख झालेल्या मनाचा
विस्तव कसा फुलवायचा
हे मात्र सोयिस्कररीत्या विसरून गेला..

जन्मापासूनच विटाळलेलं त्याचं मन..
सटवीने छद्मी हसत हातात बांधलेलं..
पिचलेलं.. पिडलेलं..
सदा भरकटलेलं..

जीव मुठीत घेवून पळणारं..
आप्तांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणारं..
आणि निवार्यासाठी
त्यांच्या दावनीचं जनावर बनणारं..

भेदरलेलं.. चटकलेलं..
किशोरवयातच डागलेलं..
भाबड्या श्रद्धेवरती
कसंतरी थबकलेलं..

हपापलेलं.. तहानलेलं..
एकलंच झुरणारं..
आणि मायेचा इवलासा
पाझर शोधणारं..

जगाच्या रहाटगाडग्यात चक्रावलेलं
आतल्या आतच घुसमटणारं..
तडकलेलं.. बावरलेलं..
तरीही बळंच सावरलेलं..

यौवनाच्या कोवळ्या पहाटेपुर्वीच
निराशेच्या अंध:कारात घसरलेलं..
गोड शिरशिरी उमटवनार्या वयात
जाणीवा हरवून बसलेलं..

ह्म्म्म्म..

सगळंच जरी थिजून गेलं
तरी काळ आपलं काम चोख पार पाडत असतो..

जसं पाणी शेंदणारं चर्हाट..
हळूहळू दगडालाही पाघळंवतं..
अंगावर खोल घट्टे देवून
त्याला स्व:पण विसरायला भाग पाडतं..
अगदी तसंच काहीतरी..

दिवस काही तेच राहत नाही असं म्हणतात..
तो ही काही अपवाद नव्हता यास..

आज त्याच्या हातात सर्व काही आहे..
पैसा आडका..
मान मरातब..
इज्जत?
पण रक्ताळलेल्या मनाच्या जखमा
कधीच भरल्या नाहीत त्याच्या..

जन्मठेप दिलेल्या कैद्यालाही
कालपरत्वे तुरुंगच सुखावह वाटू लागतो..
शिक्षा संपण्यापूर्वीच रवंगाई झाली
तरी बाहेरचं जग..
त्याच्या साठी नवीन सुरू होणारी शिक्षा असते..

तसंच काहीतरी झालंय आता त्याचं..
सगळी सुखं पायाशी लोळण घेतायेत..
पण ते उमजू शकणारं मन
कधीच मरून गेलंय त्याच्यासाठी..
त्याच्या ही नकळत..

मन करा रे प्रसन्न
असं कोणीतरी सांगून गेला..
पण त्याच्यासाठी "प्रसन्न" चा अर्थ
कायमचाच हरवून गेलाय आता..

५. सांग जगायचं कसं?


सांग जगायचं कसं?
आता कोडं हे सुटेना..

बरसूनी श्रावण आकांत..
मनी मोगरा फुलेना..
व्याकुळलेल्या धरणीची..
आग काही केल्या शमेना..

बहरूनी चांद आज..
विरही अंधार सरेना..
पिठूर चांदणं मुकाट..
काजव्याला ही पुरेना..

मंद वार्याची झूळूक..
आज केवडा हसेना..
तुझ्या बाहूपाशातील रात..
मिठी सोडता सोडीना..

तुझा बिलोरी आभास..
भार जीवा सोसवेना..
तुझा कस्तुरी श्वास..
मनी दरवळूनी ठरेना..

मागूनी प्रेमाचा जोगवा..
काही पदरी पडेना..
कसा घालू मी जागर..
त्याच्या गळी जो उतरेना..

सांग जगायचं कसं?
आता कोडं हे सुटेना..
पोरकीच ही वाट..
आज सरता सरेना..

Blogger Templates by Blog Forum