४. भेजातली अळी सरकते तेव्हा..

भेजातली अळी सरकते तेव्हा..
मी ही नसतो माझा..
तू ही नसतेस माझ्या स्वप्नातली..
पूर्ण मेंदू पोखरलेला असतो त्या अळीने कधीच..
आणि माझा झालेला असतो फक्त गुलाम..

सुरु करते ती तिचा विक्रूत खेळ..
मी पाहतो त्याकडे..
हतबलपणे..
हताशपणे..

खरंच मला असं म्हणायचंय का?
अगदी आतून तर नक्कीच नाही..
मग काय चालवलंय काय हिने नक्की?
ती खरी की मी खरा?
कसं समजणार तुलाही?
जर माझाच घात करतेय ती तर?

ह्म्म्म.. कोण पोसतंय तिला नक्की?
मी तर नाही..
पण माझा अहं..
तो तर आहेच..
कायम माझ्या वरचढ..
सदा माझ्यावर मात करत आलेला..
माझं खरं रूप कायम लपवत राहिलेला..
कायम मला डोईजड..

तुला खरं सांगू?
काय काय करायला लावतात..
मग हे दोघे हात मिळवून..
धुरांची वलयं आणि मदिरेचा महापूर..
तुटणारी नाती.. आणि विस्कटलेले अर्थ..

खरंच मला हे अभिप्रेत आहे?
नक्कीच नाही..
खरं सांगू तुला?
धुराच्या वलयात ही तुझीच प्रतिमा उभी राहते..
आणि मदिरेच्या बेधुंद नशेत ही तुझीच आस..

सोड..
कदाचित तुला समजणार ही नाही कधीच..
मी जेव्हा तुझ्याशी जितका तुटकपणे वागतो..
तेव्हा त्याच तीव्रतेने तू मला जवळ हवी असतेस..
समजावणारी..
आंजारणारी..
गोंजारणारी..
फक्त तूच हवी असतेस..

नाहीतरी तसं ही चालूचं असतं की माझं जिणं..
रोज रोज तेच..
गांडूळासारखं व्यर्थ वळवळ करणारं..
हाड हाड म्हटलं तरी तिथेच घुटमळणारं..
आसुसलेलं..
पछाडलेलं..

तुला तरी कळतंय का?
का सरकते ही भेजातली अळी?
जर खरंच कारण समजून घ्यायला जाशील..
तेव्हा कळेल तुला माझ्या मनात काय चाललेलं असतं नक्की..

पण तुला समजेपर्यंत..
ही अळी ही माझीच..
हा भेजा ही माझाच..
आणि मी खरंच तुझा दोषी..

एकाच आशेवर जगणं आहे आता..
ही अळी कधी तरी पूर्ण मेंदू पोखरील..
आणि त्याचा कोश करून त्यात गुरफटून जाईल..
आणि एक सुंदर फुलपाखरू..
तयातून झेप घेईल..

अगदी तुझ्या आवडीचं..
सप्तरंगी..

३. माझा पुनवंचा चांद..


सखे निजली ही रात..
व्यर्थ पुन्हा जोजवून..

तुझी भुललेली साद..
मंद निशिगंधी श्वास..
माझा पुनवंचा चांद..
भेगाळून जाई आज..

तुझे स्वप्नील नयन..
जागी मीलनाची आस..
माझा पुनवंचा चांद..
त्याच्या काळजाला काच..

तुझ्या प्रेमाचा बहर..
लावी सागरी भरात..
माझा पुनवंचा चांद..
अजाणतं बळ यात..

तुझी आभाळाची शेज..
त्यास चांदण्यांची रास..
माझा पुनवंचा चांद..
आज आमुशाचा दास..

तुझ्या ह्रुदयी अपार..
प्रीतझरा हा खळाळ..
माझा पुनवंचा चांद..
त्याच्या नशिबी गिर्‍हान..

सखे निजली ही रात..
व्यर्थ पुन्हा जोजवून..
माझा पुनवंचा चांद..
नभी एकला गुमान..

२. व्रण

एकटाच चालतो मी..
सरावलेल्या या पायवाटेवरुन..
ना कसली आशा नी कोणती अपेक्षा..
फक्त एकटाच चालत राहतो मी..

माझ्या ही नकळत हा मोड येतो..
आणि ही वाट जणू मला खुणावते.. 
खरंच खूप मोहक.. खूप सुंदर..
अगदी स्वप्नवत अशी ही..

अनामिक ओढीने मी..
तुडवू लागतो ही वाट..
अगदी झपाटल्यासारखी..
अधाश्यासारखी..

सगळंच काही हवं हवंस..
लोभस, गोंडस, अगदी परीकथेसारखं..
स्वर्ग ही दोन बोटं उरणारं..
मखमली स्वप्न जसं..

मला कधी कधी प्रश्न पडतो..
हे स्वप्नंच आहे की आहे हे वास्तव..
गुलाबी नशेत गर्क होत..
भान ही नाही उरत या उत्तराचं..

मदहोश बेधुंद असा जोरात ठेचकाळतो..
आणि सगळंच कोलमडून पडतं मग..
अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखं..
भाळी गहिरी खोच पडते..
भळाभळा रक्त वाहत असतं फक्त..

मी त्याच्या लालभडक रंगाकडे पाहत राहतो..
स्तब्धपणे..
सगळ्याच संवेदना बधीर झालेल्या असतात अशा वेळी..
थंड आणि निर्विकार..

हळूहळू जाणीव होत जाते फक्त..
काहीतरी आपल्यातून निसटत असल्यासारखी..
कोणीतरी ह्रुदयाची शकलं करतंय..
आणि आपण फक्त बेबस, लाचार..
केविलवाणे..
ह्याच भावनेचा काहूर..

संवेदना परतू पाहतात पुन्हा..
पडलेली जखम ही भरु लागते..
खपली धरते काळानुरूप..
आणि पिकून गळून पडते कधीशी..

जाताना मात्र देते एक खोलवर असा व्रण..
जन्मी कधीही न मिटण्यासारखा..
मीही सरावतो मग त्याला..
चालत राहतो धोपट वाट पुन्हा..

कधी काही घडलंच नाही असं..
हीच खूणगाठ मनाशी बांधत..

एखाद्या कातरवेळी नजर जाते त्या व्रणावर..
सगळेच बांध मोडून पडतात मग..
वेदनेचा महापूर ओसंडून वाहत राहतो..
आणि डोळे लालभडक रक्त गाळत असतात.. 

आठवते ती मोहक वाट अशावेळी..
मन शोधत राहतं पुन्हा पुन्हा त्या पाऊलखुणा..
पण पाय मोडेपर्यंत ती वाट तुडवली तरी..
सगळंच अनोळखी वाटत राहतं..
ती आता जणू मला ओळखच नाकारत असते..

हे सगळंच आपलं..
तरीही हे सगळंच परकं..
सांधतो आपल्यातलं अंतर हा एकुलता एक व्रण..
तेवढाच एक दुवा आपल्यातला..
जो ती ही नाकारू शकत नाही कधीच..
मूकपणेही..

ह्याच वाटेवर कधीतरी ठेचकाळलेलो..
फक्त एवढाच अबोल करार असतो आता आपल्यात..

१. ती असती तर..

ती असती तर..
कशी असती ती?

तुझ्यासारखी प्राजक्ताची फुले वेचणारी..
अन् फुलपाखरांमागे वेडं होऊन धावणारी..
श्रावणसरीत चिंब होणारी..
की पावसाचा तो ढग पाहिजे
म्हणून हट्टाने त्याचा पाठलाग करणारी..

पुस्तकात रमणारी.. कवितात हरवणारी..
भावनांच्या डोहात आकंठ डुंबणारी..
नुसत्या दर्शनाने पालवी फुलवणारी..
हसून मोत्यांची पखरण करणारी..
गालावर छानशी खळी पडणारी..
अन् जिवाला वेड लावणारी..

अवखळ.. अचपळ..
हेकट.. उत्कट..
बाजींदी.. मनमानी..
कलंदर.. 
अन् बिलंदर ही..

चैतन्याचा सळसळता झरा असणारी..
जगातील कोणतंही संकट झेलणारी..
पामरानांही कवितेचं लेणं देणारी..
मायेच्या माणसांसाठी जीवापाड झटणारी..
प्रेमाला नवा आयाम जोडणारी..
माझ्या एका एका शब्दासाठी आसूसणारी..

अशीच असती का ती?

की असती माझ्यासारखी?

गूढ.. मूढ..
अबोल.. अवघड..

स्वता:च्याच विचारांत गढून गेलेली..
आपल्यावरचं प्रेम पण न उमजणारी..
अतर्क्य.. दिशाहीन..
अथांग.. गर्तेत हरवलेली..

ती असती तर..
खरंच कशी असती ती?

कशीही जरी असती..
असती माझा जीव की प्राण..
खरंच..
फक्त ती असती तर.. 

Blogger Templates by Blog Forum